गावात परी-नामा प्रकरण जसं जसं गाजू लागलं, तसं परीच्या कुटुंबियांनी तिच्या लग्नाच्या हालचाली वाढवल्या… तिला चुलत्यापासून पुन्हा आपल्या घरी नेण्यात आलं. तिकडे रोज तिच्या बघण्याचा कार्यक्रम सुरु झाला. यापूर्वी देखील परीसाठी बघण्याचे कार्यक्रम झाले. पण वराकडील मंडळी काहीना काही कारणास्तव परीचा प्रस्ताव नाकारत होते. त्यात हुंडा हा मोठा फॅक्टर होता. जो तो लाखोंच्या घरात हुंडा मागे आणि परीच लग्न काही केल्या जुळेना. पण यावेळी घरच्यांनी कितीही हुंडा द्यावा लागला तरी चालेल, या तयारीत स्थळ शोधायला सुरुवात केली. त्यामुळे तिसऱ्याच पोरानं परीला पसंत केलं. ते पोरग बँकेत कामाला होत.
त्यानं तब्बल ६ लाखांचा हुंडा आणि दारात लग्न लावून देण्याच्या अटींवर लग्नाला होकार दिला. परीला विचारण्याचा प्रश्न उरलाच नव्हता. घरच्यांनी जमीन विकून परीचा विवाह संपन्न करायचा घाट मांडला. पण परी हतबल होणारी नव्हती. ज्यादिवशी साखर पाण्याचा कार्यक्रम होता, त्याच दिवशी तिने आपण दुसऱ्यासोबत प्रेम करतोय हे सर्वांसमोर सांगितले. पाहुण्यांची तर भंबेरी उडाली. एका क्षणांत लग्न तर मोडलंच पण स्थळं येणही बंद झालं. साऱ्या कुटुंबाची थट्टा झाली. भावकीत तोंड दाखवायला जागा राहिली नाही. त्याच दिवशी तू आमच्यासाठी मेलीस म्हणून घरच्यांनी परीला बाहेर काढलं.
परीनं पुन्हा मामाचं गाव गाठलं. अपेक्षेप्रमाणे तिकडेही दूरच्या मामानं हात वर केले. त्यानंतर परी थेट सुमनच्या घरी पोहोचली. सुमनच्या घरच्यांनी परीला निवारा दिला.
एवढंच नाही तिला ज्या मानसिक आधाराची गरज होती ती देखील दिली. सुमनचे वडील पंचायत समितीचे सदस्य होते. त्यांचा स्वत:चा प्रेम विवाह असल्यामुळे त्यानी परीच्या निर्णयाच स्वागत केलं. सुमनच्या वडिलांना गावातील सर्वच तात्या असं संबोंधायची. परी त्यांना म्हणाली तात्या तुम्हीच काही तरी मार्ग काढा यातून माझ खूप प्रेम आहे नाम्यावर. मला लग्न करायचं आहे. तात्यांनी तिला शब्दांत पकडलं. “अगं तुला लग्न करायचंय. पण त्याच काय? या सगळ्या प्रकारात त्याच्याकडील बाजू आतापर्यंत आमच्यासमोर आलीच नाही. तुम्ही एकमेकांना भेटत होता. याचा अर्थ दोघांच प्रेम होतं, हे बोलण्या इतपत ठीक आहे. पण पुढचा निर्णय घेण्यासाठी त्याच्याकडून धाडसी निर्णयाची गरज आहे. तो पोरगा आयुष्यात आपल्या मामाच्या शब्दाबाहेर गेलेला नाही. आता तो तुझ्यासोबत लग्न करेल, हा तुझा विश्वास पुरेसा नाही. तर त्याने तसा सर्वांसमोर निर्णय घेणं गरजेच आहे. मी आज त्याला घरी बोलावलं आहे. बघू काय म्हणतोय.”
संध्याकाळी ५ च्या सुमारास नाम्या सुमनच्या घरी आला. तात्यानी परीला म्हटल्याप्रमाणे त्याच्यासोबत मामाही होता. आता मामाच्या समोर परीबरोबर लग्नाला हा होकार देणार का, हा मोठा प्रश्नच. नाम्या आणि त्याचा मामा बैठकीच्या खोलीत येऊन तात्यांची वाट पाहत बसले. सुमनने त्यांना चहा आणून दिला. “तात्या येतीलच एवढ्यात मागं गेल्यात बसा हं! परी आतच बसली होती. काहीवेळानंतर तात्या आले. “नामा कशी सुरु आहे डेअरी? सिरपा आणखी गाई वाढवतोय? या प्रश्नांनी तात्यांनी दोघांशी एकाच वेळी संवाद सुरु केला. सिरपा म्हणजे श्रीपाद नाम्याचा मामा. तात्या त्याल सिरपा असंच म्हणायचे. तात्यांच्या प्रश्नावर सिरपा म्हणाला, “तात्या प्रकरण टाकलंय. दहा गाईच केलं होतं. तुमची संस्था काय तेवढ्याला तयार होईना, त्यामुळं पाच गाईवरच समाधान मानाव लागतंय. तेबी आता कवा मंजूर करत्यात कुणास ठाऊक. तुम्ही लक्ष दिलं तर होईल लगेच.” तात्या मोठ्या तोऱ्यात म्हणाले
“आर तुझ्यावर लक्ष नाही द्यायचं तर मग कुणावर द्यायचं, करुन टाकू, पण हे सांग नाम्याच्या लग्नाबद्दल काय विचार केलायस?” म्हणजे मी तुला लय कोड्यात बोलत नाही. ती महाडकाच्या पोरीसोबत उडवून टाकूयात की बार! तात्यांच्या या शब्दावर श्रीपाद थोडा गोंधळला. अन् मग म्हणाला, “तात्या ज्यावेळी दोघांची गावभर चर्चा झाली त्याच वेळी मी तिच्या मामाशी यावर बोललो. पण त्यांनी साफ नकार दिला. जर त्यांना किंमत नसेल तर मी पोराकडची बाजू असताना कमीपणा का घेऊ.
तात्या तुम्हीच सांगा? त्यानं माझी लायकी काढलेली हाय. त्यामुळे आत काही झालं तरी मी काय त्या पोरीला सून म्हणून स्वीकारणार नाही. नाम्यालाही मी तेच सांगितलंय. मी तुला वाढवलं असलं तरी तुझ्या आयुष्याचा निर्णय मी घेणार नाही. पण तिच्याशी लग्न केलसं. तर आमच्यासाठी तू मेलास! ” याचवेळी तात्यांनी परीला बाहेर बोलवलं. परी बैठक घरात येताच नाम्याच्या चेहरा फुलला. पण श्रीपाद मात्र खड्कन् उठून उभारला. तात्यांना त्यानं नमस्कार घातला आणि तिथून निघून गेला. नेहमी मामाच्या मागे जाणारा नामा मात्र शांतपणे बसून होता. खरं तर नाम्या परीशी लग्न करण्यास तयार आहे का? हा तात्यांच्या मनातील प्रश्न सुटला होता.
तात्यांनी दोन्ही कुटुंबियांना पुन्हा एकदा समजवण्याचा प्रयत्न केला. मात्र दोन्ही कुटुंब आपल्या मतावर ठाम असल्याने तात्यांनी अखेर गावातील पाच पंचांच्या साक्षीनं दोघांचा विवाह लावून दिला. ज्या मंदिरातून परीनं प्रेमाचा अध्याय सुरु केला त्याच ठिकाणी प्रेमाचं नातं आता लग्नात बदलंल. नाम्याला तात्यांनी स्वत: जवळच्या पैशांनी गावातच दुसरी डेअरी काढून दिली. त्यानं चांगला जम बसवलाय. परी तात्यांची संस्थेत काम करते. दोघ मिळून उत्तमरित्या संसाराचा गाडा चालवतायत. नाम्याचा आता तो नामदेवराव झालाय. तात्या त्याच्या शब्दांवर दुधाच्या धंद्यात डोळे झाकून गुंतवणूक करतात. कारण त्यांना नामदेवच्या यशाबद्दल खात्री आहे. नुकताच सुमीचा साखरपूडा झाला. या कार्यक्रमात आलेला प्रत्येकजण नामदेव आणि परीची जोडा लक्ष वेधून घेत होता. एकूणच परीने अशिक्षितासोबत आयुष्य घालवण्याचा घेतलेला निर्णय योग्य ठरला होता.
तात्यांच्या आशीर्वादाने ही जोडी चांगलीच फुलली. घरच्यांनी अजूनही दोघांना स्वीकारलेलं नाही. पण नामा आणि परीचा जोडा दृष्ट लागण्याजोगा आहे, अशीच चर्चा आज गावभर आहे. याच गावात काही दिवसांपूर्वी त्यांच्या रंगलेल्या प्रेमाला वेगवेगळे पद्धतीनं बदनाम केलं गेल. सुशिक्षित बेअक्कल असणारी पोरगी म्हणून परीला संबोधल गेलं. या येड्या गबाळ्यात त्या पोरीनं काय बघितलं असलं तर.. या चर्चा ऐकून नाम्याला स्वत:च्यात काहीतरी कमी असल्याचे टोमणे लग्नानंतरही सहन करावे लागले, पण दोघांनी एकमेकांना साथ देऊन दोघांविषयीचा विचार बदलायला भाग पाडलं. योग्य निर्णय, विश्वास आणि तात्यांच्या आशीर्वादाने त्यांचे प्रेम बहरले आहे. घरच्यांच्या विरोधान त्याचं प्रेम बिघडल नाही तर अधिक घट्ट झालंय दृष्ट लागण्याजोग सार घडतंय!