अवघड विषय सोपा करू. कुटुंब नियोजन

फॅमिली प्लॅनिंग, सेक्सविषयीच्या कल्पना या विषयावर लग्नाआधी चर्चा होणं आवश्यक आहे. तरच, यासंबंधीत गोष्टी आधीच स्पष्ट होऊन वैवाहिक जीवनाचा आनंद घेता येईल. मात्र, या अवघड विषयावर बोलायचं कसं? सोप्पं आहे! 

सुचित्राचं लग्न २७व्या वर्षी झालं. तिचा नवरा श्रीकांत होता एकतिसचा. सुचित्राचं वय लग्नासाठी तसं योग्य होतं; श्रीकांतसाठी थोडा उशीर झाला होता. फॅमिली प्लानिंग, मुलांसाठी आर्थिक नियोजन या गोष्टी त्याला लग्नानंतर लगेच कराव्या लागणार होत्या. त्यामुळे लगेचच मूल हवं असा त्याच्या घरच्यांकडून आग्रह सुरू झाला. श्रीकांतचाही त्याला काही विरोध नव्हता. सुचित्रानं मात्र त्याच्या या निर्णयाला नकार दर्शवला. सुरुवातीचा काही वेळ तिला श्रीकांतसोबत घालवायचा होता. नव्या नोकरीत स्थायिकही व्हायचं होतं. त्यामुळे तिला लगेचच मातृत्त्व स्वीकारायचं नव्हतं. या गोष्टीवरून श्रीकांत आणि सुचित्रामध्ये वाद होऊ लागले. अखेर तो वाद कौन्सलरपर्यंत पोहोचला. तेव्हा लक्षात आलं, की लग्नाआधी त्यांनी या गोष्टीवर अजिबात वाच्यता केली नव्हती. तसं बोलणं आधीच झालं असतं, तर वाद संभावलाच नसता.



… श्रीकांत आणि सुचित्रासारखी उदाहरणं आपल्याही अवतीभोवती दिसतील. लग्नाआधी ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी मनमोकळेपणानं बोलणं गरजेचं असतं, त्यामध्ये सेक्सविषयी कल्पना, फॅमिली प्लॅनिंग याही महत्त्वाच्या आहेत. मात्र, या विषयावर चर्चा, मत व्यक्त करणं, समोरच्याला प्रश्न विचारणं याबाबत आपल्याकडे अजूनही ‘टॅब्यू’च आहे. मित्रांच्या घोळक्यात किंवा लव्ह मॅरेजमध्ये असे विषय सहज निघत असले, तरी ठरवून लग्न करताना त्यावरील चर्चेला बगलच दिली जाते. ते काहीतरी घाणेरडं, न बोलण्यासारखं, आचरटपणाचं किंवा वाह्यातपणाचं लक्षण आहे अशीच समजूत असते. सुचित्रा आणि श्रीकांत यांच्याबाबतीत हेच घडलं. लाजेपोटी त्यांनी या विषयावर चर्चाच केली नाही. त्याचे परिणाम त्यांना लग्नानंतर भोगावे लागले. मात्र, या विषयाची चर्चा ही नक्कीच झाली पाहिजे. हा विषय का महत्त्वाचा? 

सध्याला लग्न हा विषय गुंतागुंतीचा झाला आहे. लग्नाचं वाढतं वय आणि नवरा मुलगा-नवरी मुलगी यांच्या वयातलं जास्त अंतर यामुळे फॅमिली प्लॅनिंगसारखा विषय लग्न ठरल्यानंतर बोलणं आवश्यक आहे. भविष्याच्या दृष्टीनं त्यावर आधीच चर्चा झाली पाहिजे. तरच वाद टाळता येतील आणि त्यानुसार वैवाहिक आयुष्याचं नियोजन करता येईल. सेक्स आणि फॅमिली प्लॅनिंग हा विषय खरं तर संवेदनशील आहे. त्यावरून का जर वाद निर्माण होऊ लागले, तर त्याचा एकंदरितच व्यक्तिगत जीवनावर विपरित परिणाम होऊ लागतो आणि ते टाळणं बरेचदा हाताबाहेर जातं. यावर एकमेकांच्या चर्चेतून, मत घेण्यातून तोडगा निघाला, तर लग्नानंतर सामोपचारानं प्रश्न सोडवता येईल. 

स्पेशल कथा वाचा :  नाते दृढ करणाऱ्या या छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला माहीत हव्यात

बोलावं कधी? 


‘या विषयावर बोलायला मुली फारशा मोकळ्या नसतात. त्यांना विचित्र वाटतं आणि बोलल्याच तर, ही किती बोल्ड आहे अशी समोरच्याची समजूत होते. त्या बोलण्याचा वेगळा अर्थही काढला जाण्याची शक्यता असते,’ असं कौन्सेलर गौरी योहान-कोठारी सांगते. ठरवून लग्न करणाऱ्या मुली/मुलं कितीही शिकलेल्या/शिकलेली असले, तरी या विषयावर बोलण्यात कचरतातच, अशी पुष्टी कौन्सेलर अश्विनी लाटकर जोडतात. मात्र, प्रत्येक मुलाशी/मुलीशी या विषयावर बोलण्याची घाई केली, तर इमेज खराब होऊ शकते हेही लक्षात घ्या. हा विषय बोलताना हातचं राखून किंवा झाकून ठेऊन बोलण्यातही काहीच फायदा नाही. मात्र, लग्न ठरल्यानंतरच हा विषय निघालेला बरा, असं गौरी आणि अश्विनी दोघीही सांगतात. भावनिकदृष्ट्या जवळ आल्यानंतरच शारीरिकदृष्ट्या जवळ येण्याची मानसिक प्रक्रिया सुरू होते. नात्यात तो मोकळेपणा आणि अॅटॅचमेंट आल्यानंतर हा फॅमिली प्लॅनिंगचा विषय काढावा. 

बोलावं कसं? 

हा विषय बोलताना भाषा काळजीपूर्वक वापरावी लागते. ज्यायोगे समोरच्याला विचित्र वाटणार नाही. बोलणं फार उथळही नको आणि भडकही नको. त्यात योग्य तो समतोल हवा. म्हणजे, फॅमिली प्लॅनिंग, सेक्स याविषयी तुझे काय विचार आहेत, पहिलं मूल कधी हवं याविषयी आपण दोघं मिळून निर्णय घेऊयात, तुला पहिलं मूल कधी हवंय, घरच्यांचं याविषयी काय मत आहे, मातृत्त्व किंवा पितृत्त्व याविषयी तुझ्या कल्पना काय आहेत… अशी भाषा यासाठी वापरता येईल. सेक्स आणि फॅमिली प्लॅनिंग याविषयी चुकीच्या माध्यमांमधून अनेकदा चुकीची माहिती मिळवली जाते. लग्नाआधीच्या चर्चेला ती अनेकदा घातक ठरू शकते. लग्नानंतरही त्याचे पडसाद व्यक्तिगत जीवनावर उमटतात. त्यामुळे तज्ज्ञांचीही मदत घेता येईल. या गोष्टी बोलणं गरजेचं आहे असं वाटतं; पण दोघांनाही विषय काढणं लाजीरवाणं वाटत असेल, तर स्त्रीरोगतज्ज्ञाची मदत घेता येईल. ज्यायोगे शास्त्रशुद्ध माहिती मिळेल आणि नंतर विवाहेच्छुक दोघांना नंतर एकांतात बोलणं सोप्पं होईल. म्हणून तर प्री-मॅरेज कौन्सेलिंगमध्ये सेक्स आणि फॅमिली प्लानिंग हा विषय मुद्दामच घेतला जातो. 

Rate this post

Leave a Comment

error: Content is protected !!