बघता बघता आदित्य आणि करमचा संसार सुरू होऊन दोन महिने होतात. दरम्यान आदित्य काम करत असलेली कंपनी त्याचा प्रामाणिकपणा व कामातील उत्तम परफॉर्मन्स पाहून त्याला प्रमोशन देऊन त्याची असिस्टंट मॅनेजर या पदावरून थेट मुख्य जनरल मॅनेजर या पदावर नियुक्ती करते. ही आनंदवार्ता ऐकून करमला खूप आनंद होतो. हे सर्व करम सारखा जीवनसाथी आपल्या आयुष्यात आल्यामुळेच शक्य झालं आहे असं म्हणत आदित्य कौतुकाने करमला आपल्या मिठीत घेऊन त्याच्या ओठांचं दीर्घ चुंबन घेतो.
जसजसे दिवस पुढे पुढे जात असतात तसतसं त्या दोघांचं नातंही अधिक घट्ट, अधिक गहिरं होत जातं व जसजसं त्यांचं नातं घट्ट होत जातं तसतसं आदित्यच्या घरच्यांच्या मनातील करमच्या बाबतीत असलेली घृणाही दिवसेंदिवस अधिकाधिक गडद होत जाते. आता तर हळूहळू आदित्यच्या गैरहजेरीत ते उघडपणे करमचा अपमानही करू लागतात. परंतु, तरीही करम आदित्यकडे त्यांची अजिबात तक्रार न करता एक किन्नर असल्यामुळे आजवर आपण लोकांनी, समाजाने केलेले अपमान, निंदा, घृणा इत्यादी सारं सहन कलं त्यापुढे आदित्यच्या घरच्यांनी केलेला आपला अपमान काहीच नाही अशी स्वतःचीच समजूत घालत चुपचाप सारं काही सहन करत रहातो.
परंतु, एके दिवशी तर त्यांच्या अशा वागण्याची हद्दच होते व त्यामुळे आदित्यलाही आपल्या घरच्यांचं खरं रूप काय आहे ते कळतं…
त्याचं असं होतं की, एक दिवस कंपनीच्या कामानिमित्त दोन दिवसांसाठी आदित्य बाहेर गावी गेल्यामुळे करमला खूप एकटं एकटं वाटत असतं. अर्थात, घरात आदित्यचे आई वडील व धाकटा भाऊ मानव जरी असले तरी त्यांच्यालेखी आपल्याला काहीही किंमत नाही याची जाणीव असल्यामुळे ते असून नसून सारखेच आहेत असा विचार करत आपल्या खोलीत बसलेला असताना तेथे अचानक मानव येतो.
मानवला असं अचानक आपल्या खोलीत आलेला पाहून करमला आश्चर्य वाटतं कारण की लग्न होऊन या घरात आल्यापासून आतापर्यंत करमची आदित्यच्या आईवडिलांनी व मानवनंही कधी साधी विचारपूसही केली नसल्यामुळे आज चक्क मानव आपल्याकडे कसा काय आला याचं त्याला नवल वाटतं. त्याबद्दल मानवला विचारलं असता उत्तरादाखल तो वखवखलेल्या नजरेने करमला अपादमस्तक न्याहाळत त्याच्या डोळ्यात डोळे घालत म्हणतो की, “बऱ्याच दिवसांपासून माझी एक तक्रार आहे की माझी तथाकथित किन्नर वहिनी जसे माझ्या दादाचे लाड करत त्याला प्रेमाने आपल्या मिठीत घेते तसेच तिने आज माझेही लाड करावेत व मलाही मिठीत घेऊन आपल्या मदमस्त शरीराची चव चाखु द्यावी. तसंही आदित्य दोन दिवस इथं नसल्यामुळे आपल्याला डिस्टर्ब करायला कुणीही नाही. तेव्हा या सुवर्ण संधीचं सोनं करण्यासाठी वेळ न दवडता स्वतःला माझ्या स्वाधीन करत बेडवर चल आणि आदित्यप्रमाणे मलाही तृप्त कर. कामक्रीडेत तुला माझ्याकडून आदित्य देतो त्यापेक्षा जास्त सुख मिळेल. आजवर मी इतक्या जणींच्या शरीराचा उपभोग घेतला पण आज जरा मलाही कळू देना की एका किन्नराच्या शरीराची चव असते तरी कशी?”
त्याच्या या बोलण्याने चपापुन जाऊन करम त्याला म्हणतो, “मानव भाईजी, तुम्ही काय बोलताय हे तुमचं तुम्हांला तरी कळतंय का? आता आदित्य इथं नाहीत जर त्यांना हे तुमचं असलं वागणं समजलं तर तुमची काही खैर नाही हे लक्षात ठेवा. मी जरी एक किन्नर असले तरीही आता मी आदित्यची, तुमच्या मोठ्या भावाची पत्नी आहे व या नात्याने तुमची वहिनी आहे. सिंघवी परिवाराची सून आहे याचं जरा भान ठेवा आणि इथून चालते व्हा.” यावर मानव छद्मी हसून उन्मत्तपणे म्हणतो की, “तूझ्यासारखा सिग्नलवर भीक मागणारा, जो धड पुरुषही नाही आणि स्त्रीही नाही त्यात प्रसंगी वेश्या व्यवसायही करणाऱ्या तृतीयपंथी समाजातील एक किन्नर माझी वहिनी? व सिंघवी परिवाराची सून? व्वा! काय विनोद आहे नाही! माझ्या भावाच्या निवडीचं खरंच मला हसू येत आहे. एका स्त्री सोबत संसार थाटण्याऐवजी एका तृतीयपंथीयासोबत संसार थाटला. एवढा शिकलेला माणूस पण त्याने तुला निवडलं म्हणजे नक्कीच त्याची अक्कल कुठंतरी शेण खायला गेली असावी असंच म्हणावं लागेल. कधी कधी तर मला संशय येतो की तोही तुमच्याच समाजातील तर नाही ना?” असं म्हणत करमच्या जवळ जाऊ लागतो.
मानव जसा करमच्या जवळ जाऊ लागतो तसा त्याच्या तोंडाला येणारा दारूचा उग्र दर्प करमच्या नाकात गेल्यामुळे तो मागे हटतो व पुन्हा रागाने त्याला बाहेर जाण्यास सांगत सुनावतो की, “अक्कल त्यांची नाही तर तुमचीच गुडघ्यात आहे. म्हणून जिथे तिथे तोंड मारत फिरता. हो आहे मी रस्त्यावर भीक मागणारा किन्नर, पण आज याच किन्नराला आदित्य सारखा एक देवमाणूस आपलं मानून मैत्री करत एक भाव भावना असलेला, मन असलेला ‘माणूस’ समजून प्रेम देऊन आपल्या घरी घेऊन आला तर त्यात काय चुकलं? त्यांनी माझं शरीर वा लिंग नाही तर माझं मन पाहिलं. मान्य आहे, कित्येकदा आमच्या समाजातील काही लोकांना वेश्या व्यवसायही करावा लागतो पण त्यालाही तुमच्या सारखेच स्वतःला मोठे सुशिक्षित, सुसंकृत, विद्वान, आधुनिक समजणारे लोकंच जबाबदार आहेत.
अरे, तुम्ही तथाकथित सुसंस्कृत लोकं साधं आम्हांला आपल्या आसपासही फिरकू देत नाहीत, जर आम्ही स्वाभिमानाने, सन्मानाने जगायचं ठरवलं, स्वतःच्या पायावर उभं राहायचं ठरवलं तर कुठे नोकरीही देत नाहीत वा कसला कामधंदाही करू देत नाहीत. आम्हालाही पोट आहे व त्यात भूक आहे. त्यामुळे दोन वेळच्या जेवणाची सोय व्हावी म्हणून आम्ही नाईलाजाने सिग्नलवर भीक मागतो व कधी तीही नाही मिळाली तर वेश्या व्यवसाय करतो. आम्हांला माणूस म्हणून नाकारणारे, आमच्या शरीराचे लचके तोडणारे लांडगे तुमच्या या तथाकथित पांढरपेशा, सुशिक्षित समाजातीलच लोक आहेत ही गोष्ट कायमच स्मरणात ठेवा.” पण निगरगट्ट मानव करमचं काहीही न ऐकता उलट त्याच्या आणखी जवळ जाऊन त्याला जबरदस्तीनं आपल्या मिठीत घेऊ लागतो. त्याच्या अश्या कृतीमुळे संतप्त होऊन करम अखेर त्याच्या जोरदार कानाखाली मारतो.
क्रमशः