सोपानराव चांगले गृहस्थ , सरकारी लिपीकाची नौकरी, गावकडची शेती विकून शहरात दहा पंधरा रूमचा वाडा बांधलेला. बायको मालनबाई यांची त्यांना चांगली साथ , पहिला मुलगा होतो, आदर्श त्याचे नाव पण त्याचा आदर्श घ्यावा असे कुठलेही गूण त्याच्याकडे नव्हते . तो सोपानराव व मालनबाईचा लाडके कोंडूळे असतो कारण त्यानंतर या दांपत्याच्या पोटी चारमुली जन्माला येतात.
यावरूनच मी या कथेला शिर्षक दिले “फोर प्लस वन” …. असो तर या सोपानरावला उत्पन्न चांगले असते पण दारू व पत्त्याचे व्यसन असते. त्यामूळे ते चार मुलीकडे जादा लक्ष देत नाही. सगळा पैसा त्यांचा मुलाचे लाड करण्यात व स्वत:च्या व्यसनावर खर्च करत असता.
पुढे कालातंराने एका पाठोपाठ तीन मुलींचे लग्न ते कधी कर्ज काढून तर कधी शेतीचा तूकडा विकून धूमधडाक्यात करतात.
मोठ्या मुलीचे राधा नांव , दिसायला छान पण जादा शिष्ट, असो तिला सरकारी नौकरदार नवरा मिळतो त्याचापण शहरातच भलामोठा वाडा असतो, नंबर दोनच्या मुलीला पण शेती, घरदार व सरकारी नौकरी असलेला मुलगा नवरा मिळतो. या मुलीचे नांव सीता असते , मुलगी छान पण नवरा तिच्यापेक्षा चांगलाच वयस्कर असतो एवढेच नाहीतर तो खोटारडा , संशयी माणूस असतो पण सीता चुपचाप त्याला आईवडील व भावाच्या धाकाने स्वीकारते.
पण तिसरी गिता मात्र तिला सरकारी नौकरीवाले , श्रीमंताचे मुले बघायला येतात तेंव्हा ती मुलांना नाकारते कारण तिला “पैसाने श्रीमंत नाहीतर मनाने श्रीमंत “ नवरा पाहिजे होता. ती आईवडील बहिण भावाचे काहीच एेकत नाही. ते सगळे तिच्यासमोर हतबल होतात.
पण एक दिवस ते सगळे वैतागून एका खाजगी नौकरी करणार-या मुलासोबत तिच्या पसंदीनूसार लग्न करून देतात.पुढे त्याच्या तुटपूंज्या पगारात , भाड्याच्या घरात रहात असताना तिची चांगलीच त्रेधातिरपट होते पण ती कधीच त्याचे दु:ख दाखवत नाही कारण तिला मिळालेला जोडीदार एकदम तिला हवा तसाच असतो. पण खरे अपमान नाट्य तिच्या आयुष्यात आता सुरू होते…..तिन्ही लहान बहिणींचे लग्न झाल्यावर जेंव्हा त्यांच्या एकलूत्या एक मोठ्या भावाचे लग्न करायचे निश्चित होते तेंव्हा….
या नंबर तीनच्या मुलीला म्हणजेच गिताला व तिच्या नवर-याला मुद्दामहून दूर ठेवले जाते. पाहुण्यासमोर येऊ देत नाही . काय तर म्हणे कि त्यांच्याकडे महागडे कपडे , दागिने व गाड्या घोड्या नाही. मोठ्या दोघीपेक्षा सुंदर असूनही केवळ श्रीमंत नाही म्हणून तिसर-या मुलीला आईवडील भाऊबहीण दूर ठेवत होते . शेवटी गिताच्या भावाचे लग्न जमले तेंव्हा तिला मोठ्या बहिणीचे दागिने व कपडे घालून लग्नात सामील व्हायला बजावले पण तिने नकार दिला. बेन्टेक्स ज्वैलरी घालून ती लग्न सोहळ्यात सामील झाली.
हा अपमान गिताने पचवला होता पण पुढे झालेला अपमान तिला असह्य होणारा होता ….गिताने मोठ्या कष्टाने चार पत्राचे घर विकत घ्यायचे ठरवले तर मदत करण्याचे सोडून तिचे सर्व नातलग तिला बोलले की … “ कर्ज काढून घर घेतेस , खायचे प्यायचे कसे करणार ? त्या घराच्या भिंती चाटत बसणार का?”
तिने व तिच्या नवर-याने टोमणे सहन केले पण जिद्द सोडली नाही ,दाग दागिने गहाण ठेऊन , कर्ज काढून स्वत:चे घर घेतलेच , त्याच चार पत्र्याच्या खोलीत ते दोघे आपल्या एका मुलासह आनंदाने रहात होते .
तेथे एक दिवस तिच्या बहिणीची सासू आली , तिच्यासोबत आणखी दोन चार पाहुण्या महिला पण होत्या ….
सगळ्या गर्भश्रीमंत होत्या घरच्या, त्या सर्वासमोर तिच्या बहिणीची सासू बोलली की “ सोपानरावनी काय भिकार-याला दिले गिताला? “ हे बोल तिच्या वर्मी लागले …. त्यादिवशी संध्याकाळी ती आपल्या प्रिय नवरा कामावरून येताच त्याला सिताची सासू काय बोलली ते रडतच सांगते. तो तिला जवळ पकडून समजावतो अन सांगतो की “ बघ गिता ,एकदा घोर तपश्चर्या करून तृप्त झालेले एक मुनिवर्य जात असता झाडावरचा कावळा त्यांच्या डोक्यावर घाण करतो. मुनिवर्य रागाने कावळ्याकडे पाहताच कावळा जळून खाक होतो. मुनिवर्य आपल्या तपश्चर्येच्या सामर्थ्यापुढे संतुष्ट होतात. पुढे एका घराच्या दारात अचानक भिक्षेसाठी उभे राहतात. आवाज देतात की “ माये भिक्षा दे”…त्या घरातील गृहिणी ते एेकते पण घरात पक्षाघाताने विकलांग असलेल्या तिच्या नवऱ्याची ती सेवा करत असते. बराच वेळ जातो. मग ती भिक्षा घेऊन येते. मुनींना संताप येऊन ते जळजळीत नजरेने तिच्याकडे पाहतात.
ती हसून म्हणते, ‘नवऱ्याची सेवा अर्धवट सोडून मी आपल्याला भिक्षा वाढायला येऊ शकत नव्हते. मला झालेल्या विलंबामुळे आपण रागावला आहात, हे तर दिसतेच आहे. पण तुमच्या तपश्चर्येच्या सामर्थ्याने जळून खाक व्हायला, मी काही कावळा नव्हे.’ मुनी थक्क होतात. त्यांचा तपश्चर्येचा दंभ क्षणात मावळतो…..
लेखक ~रावसाहेब चव्हाण