करमच्या आणि आदित्यच्या नात्याबद्दल करमच्या किन्नर समाजाची मुख्य असलेल्या गुरुमाईला माहीत झालेलं असतं व दोन तीन वेळा करमने तिची आणि आदित्यची भेटही घडवून आणलेली असते. तिलाही आदित्यची वागणूक, त्याचा स्वभाव मनापासून आवडलेला असतो. ही गुरूमाई जरी तृतीयपंथीयांची मुख्य असली व स्वभावाने कितीही कडक जरी असली तरीही तिच्यात माणुसकीही तितकीच असते व तिच्यात एका आईचं काळीजही असल्यामुळे जेव्हा करम तिला आदित्यने आपल्याला लग्नाची मागणी घातली आहे असं सांगत आपण त्याच्याशी लग्न करण्यास होकार द्यावा का नाही? असा मनात संभ्रम आहे असं सांगतो तेव्हा आपल्या आयुष्यात भवतालच्या दांभिक समाजाचे व स्वार्थी पुरूषी मानसिकतेचे भयानक अनुभव घेतलेली ती गुरूमाई आधी नकार देते खरी पण आदित्यच्या रूपाने करमला एक चांगला साथी मिळाला आहे जो त्याला सुखात ठेवेल व किमान करमला तरी आपल्या माणसांच्या प्रेमाचं, आपुलकीचं सुख मिळू दे, आपल्या हक्काचं घर मिळू देत असा विचार करत करमला आदित्यला त्याच्या व करमच्या लग्नाबाबत सविस्तर बोलणी करण्यासाठी आपल्याला येऊन भेटण्यास सांगते.
जेव्हा आदित्य गुरुमाईला भेटायला येतो तेव्हा तीही त्याला करमप्रमाणेच या दोगल्या समाजाच्या हीन मानसिकतेची, त्यांच्या लग्नामुळे भविष्यात त्या दोघांना होणाऱ्या संभाव्य त्रासाची कल्पना देत त्याच्या परिवारालाही त्याच्या व करमच्या नात्याबद्दल कल्पना द्यायला सांगते. तेव्हा याबाबत करमला दिलेलं आपलं तेच ठाम उत्तर तो तिलाही देत आपल्या घरातील मंडळींशी आपण याबाबत नक्की बोलू व तेही आपल्यासारखेच मोकळ्या, आधुनिक विचारांचे असल्यामुळे करमला नक्की स्वीकारतील अशी खात्री तो तिला देतो. आदित्यने असं आश्वस्त केल्यामुळे शेवटी गुरूमाई करमच्या भविष्याबाबत निश्चिन्त होते व करमलाही मनातील किंतु, परंतु ,भीती आदी बाजूला ठेवण्यास सांगत मोकळेपणाने आदित्य बरोबर संसार करण्याची अनुमती देते.
मग साधारण एका आठवड्याने आदित्य आपल्या आईवडिलांना आपल्या व करमच्या नात्याबद्दल सविस्तर सांगत आपल्याला फक्त करमशीच विवाह करायचा आहे असंही सांगतो.
करम एक तृतीयपंथी आहे ही गोष्ट जेव्हा आदित्यच्या घरच्यांना समजते तेव्हा ते अक्षरशः थयथयाट करतात. आदित्यला ही कसली दुर्बुद्धी सुचली म्हणून त्याला प्रचंड रागावतात. धाकटा मानवही आपल्या आईवडिलांच्या सूरात सूर मिसळून आदित्यला नको नको ते सुनावतो. एक तृतीयपंथी आपल्या सारख्या प्रतिष्ठित सिंघवी परिवाराची सून व्हावी ही कल्पनाच त्या तिघांना सहन होत नसते. वडिल हर्षवर्धनराय तर आदित्यच्या असल्या निर्णयामुळे गडगंज बापाची लेक सून म्हणून आणण्याच्या आपल्या स्वप्नाला सुरुंग लागला म्हणून दात ओठ खात त्याच्या थेट श्रीमुखातच भडकावतात. परंतु, आदित्य मात्र करमशी लग्न करण्याच्या आपल्या निर्णयावर ठाम रहात त्यांना त्या परिस्थितही समजावण्याचा प्रयत्न करतच रहातो. तो त्यांना विनवणी करत म्हणतो की, “पिताजी किमान एकदा तरी तुम्ही करमला भेटून तो माझा जीवनसाठी म्हणून कसा लायक आहे ते पडताळून तर पहा. तो जरी किन्नर असला तरी त्याच्यात एक चांगली पत्नी, सून व्हायची सर्व लक्षणे आहेत. करम पैशाला, संपत्तीला अजिबात लालची नाही हे मी त्याच्या इतक्या दिवसांच्या सहवासात राहून स्वतः अनुभवलं आहे. इतकंच काय, माझा रस्त्यावर अपघात झाला असता या करमनेच मला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करून माझा जीवही वाचवला आहे. अहो, करम जरी किन्नर असला तरी समजूतदार, सालस, सुसंस्कृत आहे. त्यालाही प्रेम हवंय, एक हक्काचं घर हवंय. आपली हक्काची अशी माणसं हवी असल्यामुळे तो माझी व तुम्हा सर्वांचीही अगदी मनापासून व्यवस्थित काळजी घेईल हे मी तुम्हांला अगदी खात्रीने सांगतो आहे. तेव्हा कृपया माझ्यावर विश्वास ठेऊन, एक पिता म्हणून नाही तर एक माणूस म्हणून आमचं प्रेम, आमच्या भावना समजून घ्या.”
पण कुणाचं ऐकतील तर ते हर्षवर्धनराय सिंघवी कसले? उलट आदित्यच्या अशा बोलण्याने ते आणखी संतापतात व धमकावत म्हणतात की, “मुळात तुला रे असं वाटलंच तरी कसं की आम्ही सिग्नलवर भीक मागणाऱ्या एका किन्नराला आमची सून करून घेऊ? बाहेर समाजात आपल्या सिंघवी परिवाराला मान आहे, प्रतिष्ठा आहे, दरारा आहे. तू जर एका किन्नराला सून म्हणून घरात आणलंस तर समाजात आमची काय पत राहील? आमचा सारा मान सम्मान, प्रतिष्ठा धुळीस मिळेल, लोकं तोंडावर थुंकतील. या निमित्ताने बिझनेस मधील आपल्या प्रतिस्पर्ध्यांच्या हाती तर आयतं कोलीतच मिळेल. तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेव, जर का तू करमशी लग्न केलंस तर आम्हाला, या घराला कायमचा अंतरशील. तुला आम्ही आमच्या सर्व इस्टेटीमधून बेदखल करू. तेव्हा पुन्हा एकदा नीट विचार कर आणि ठरव काय ते.” परंतु आपल्या निर्णयावर अटल असलेला आदित्य शेवटी त्यांच्या नजरेला नजर देत ठामपणे एवढंच सांगतो की, “जर तुमचा हाच निर्णय असेल तर ठीक आहे मी माझ्या हक्कावर पाणी सोडत वेगळं रहायला तयार आहे पण लग्न करेन तर करमशीच अन्यथा आजीवन बिन लग्नाचाच राहीन.” त्याच्या या निर्वाणीच्या उत्तराचा मात्र हर्षवर्धनरायांवर परिणाम होतो व त्याच्या नजरेतील तो ठामपणा, ती चमक पाहून शेवटी एक पाऊल मागे घेत मनाशी एक कुटील निर्णय घेऊन ते त्याच्या आणि करमच्या लग्नाला राजी होतात व आपल्या पत्नी व धाकट्या मुलालाही राजी करत शेवटी आदित्यलाही “आमची या लग्नाला परवानगी असून त्या संदर्भात पुढील गोष्टी बोलण्याआधी आम्हांला करमला एकदा भेटायचं आहे” असं सांगतात.
अखेर आपण आपल्या आईवडिलांना आपल्या आणि करमच्या विवाहासाठी राजी केलंच! या विचाराने आदित्यचा जीव भांड्यात पडतो व त्या आनंदात दुसर्याच दिवशी करमला भेटून आदल्या दिवशी घरी जे काही झालं ते सर्व सांगत शेवटी घरच्यांनी आपल्या विवाहाला परवानगी देत त्यांनी करमला एकदा भेटायची इच्छाही व्यक्त केली आहे हेही सांगतो. ते ऐकून करमलाही आनंद होतो.
आदित्य आणि करमच्या संबंधाला आणि त्यांच्या विवाहाला विरोध करणारे हर्षवर्धनराय अचानक असा नेमका कोणता निर्णय घेऊन राजी होतात? हे आपल्याला पुढे कळेलच.
क्रमशः